नवी मुंबई लोणारी समाज परिचय मेळावा
दिनांक: २७ मार्च २०११
प्रस्तावना: नवी मुंबई लोणारी समाज परिचय मेळावा आयोजित करण्याची संकल्पना श्री. विजय गेंड यांनी मांडली. त्याप्रमाणे नवी मुंबई, पनवेल, उरण, अलिबाग परिसरातील लोणारी समाजाची जनगणना करण्यात आली. जवळ जवळ २००० लोकसंख्या नवी मुंबईमध्ये वास्तव्य करीत असल्याचे जणगणनेवरून समोर आले. बर्याच नवी मुंबई मधील लोणारी समाज बांधवांची एकमेकांशी ओळख व परिचय नसल्यामुळे परिचय मेळावा घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांवर जबाबदारी देऊन काम करण्याचे ठरविले. प्रथम परिचय मेळावा घेऊ नंतर पुढील चळवळीची आखणी करू असे ठरविण्यात आले. जर समाज एकत्र आला तरच समाजाची राजकीय, शैक्षणिक व आर्थिक प्रगती होईल.
कै. विष्णुपंत दादरे (लोणारी) यांची प्रेरणा घेऊन सर्वांनी समाज कार्यात खारीचा वाट उचलायला हवा. आपण लोणारी समाजात जन्म घेतला मग आपण समाजाचे काही देणे लागतो हे विसरून चालणार नाही. सर्वांनी एकत्र येऊन समाजाची ताकत दाखविली तरच आपल्याला कोणी विचारेल. हा करतोय तो करतोय म्हणून गप्प राहिलात तर उद्याची पिढी माफ करणार नाही. जर वेळ देता आला नाही तर आर्थिक मदत देऊन समाजकार्यात सहकार्य करावे.
शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या कै. दादरे साहेबांच्या प्रेरणेने त्यांच्या निःस्वार्थ कार्याने सर्वांनी प्रेरित होऊन या समाज यज्ञात सामील व्हावे. कै. दादरे साहेबांनी अशिक्षित समाज एकत्र केला पण आता सर्व समाज सुशिक्षित झाला आहे. आपल्या कलेचा व कौशल्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. आपल्याला जमेल त्याप्रमाणे लोणारी समाज विकासासाठी सहकार्य करावे हि विनंती.
सगळ्यांनी उभे राहून लोणारी प्रतिज्ञा घेतली व लोणारी समाजाशी एकनिष्ठा राहीन अशी सर्वांनी शपथ घेतली.
समाजाचे आधारस्तंभ यांना व्यासपीठावर विराजमान होण्यास सांगितले त्याप्रमाणे श्री. जनार्दन आटपाडकर, श्री. विलास खिल्लारी, श्री. रामहरी कुटे, श्री. सुखदेव येडवे, श्री. संजय ढेबंरे, श्री. वसंतराव सांगोलकर, कु. स्वप्नजा क्षीरसागर, श्री. राजेश निमगिरे, श्री. शंकर काळेली, श्री. अशोकराव होळकर(पुणे), श्री. रवींद्र होळकर, श्री. किसन घेरडे, श्री. भोजा काळेल, श्री. सिद्धेश्वर डुकरे, श्री. भीमा गव्हाणे, श्री. भरत बाड व श्री. किशोर आढाव.
वरील सर्व लोणारी समाजाच्या उच्च शिक्षित अधिकारी व पदाधिकारी आणि आपला परिचय करून दिला.
श्री. विजय गेंड यांनी नवी मुंबई लोणारी समाज परिचय मेळावा आयोजित करण्यामागची संकल्पना सांगितली. त्यांनी सांगितले कि श्री. नितीन काळेल व त्यांच्या मित्र मंडळींनी www.lonari.com हि वेबसाईट सुरु झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामधील व बाहेरील लोणारी समाजाचा परिचय होऊ लागला आहे. तरी हि सर्व मंडळी एकत्र करून त्यांचा एक मेळावा आयोजित करायला हवा. श्री. विजय गेंड यांनी कार्यक्रमाला मदत करणार्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. सर्व कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला.
श्री. सुनील आटपाडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मान्यवरांनी समाजास उद्देशून केलेली भाषणे:
कु. स्वप्नजा क्षीरसागर:
माझ्याप्रमाणे चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन मुलींनी पुढे यायला पाहिजे. मी मुंबई महानगरपालिकेत उप अभियंता या पदावर काम करीत आहे. कार्यक्रमास बोलवून मला मान दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
श्रीमती संजीवनी करांडे:
लोणारी समाज सेवा संघ मुंबई या संस्थेस स्थापन होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता स्त्रियांची उपस्थितीही ५०% आहे. म्हणजे पुरुषांबरोबर स्त्रियाही ५०% च्या भागीदार झाल्या आहेत. स्त्रियांनी कुटुंबाबरोबर स्वतःलाही वेळ द्यायला हवा, स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या मुलांकडेही लक्ष द्या. त्यांना मोठे करा. स्त्री सबलीकरण योजना आहेत, बचत गट यांसारख्या संस्था स्थापन करून स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे. घरामध्ये टी.वी. पाहण्यापेक्षा वाचन करा मगच बाहेर काय चालले आहे ते कळेल.
श्री. रवींद्र होळकर (पुणे लोणारी समाज उपाध्यक्ष):
अखिल भारतीय वधू वर संस्थेचे सर्वांनी सभासद व्हावे. तुम्ही कार्य करीत जा पैसा कमी पडणार नाही. स्वच्छ कारभार ठेवा, लोकांचा विश्वास संपादन करा. पुणे हे शिक्षांचे माहेरघर असल्यामुळे बर्याच लोणारी विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय, योजना पुणे लोणारी समाज संघातर्फे करण्यात आली आहे. पुण्यामध्ये कोणत्याही प्रकारची मदत लागली तर माझी अवश्य भेट घ्या असे त्यांनी सांगितले.
श्री. जनार्दन आटपाडकर (सहाय्यक विक्रीकर आयुक्त, मुंबई):
आपल्या समाजामध्ये एकत्र येऊन समाजाचा विकास करण्यापेक्षा एकमेकांमधले हेवेदावे फार आहेत. तर समाजाने हेवेदावे विसरून एकत्र यायला पाहिजे. मी प्रथम पोस्टमध्ये सर्विसला होतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन विक्रीकर विभागामध्ये सर्विसला लागलो. ज्या ज्या लोणारी बांधवांना महराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंबंधी मार्गदर्शन पाहिजे त्यांनी मला संपर्क करणे. जशी नवी मुंबई मध्ये जनगणना झाली त्याप्रमाणे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनगणना करावी.
श्री.प्रकाश कर्चे (R.T.O. अधिकारी, बेलापूर, नवी मुंबई):
ज्याप्रमाणे नवी मुंबई मध्ये कार्यक्रम होत आहे त्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रामध्ये जनगणना करून मेळाव्याचे आयोजन करा. समाज एकत्र आल्याशिवाय प्रगती नाही. दबावगट निर्माण झाल्याशिवाय आपल्यालाला कोणी विचारणार नाही, हेवेदावे सोडा, एकत्र या. प्रगती निश्चित होईल.
श्री. विलास खिलारी (सहायक अभियंता मुंबई महानगरपालिका)
श्री. विजय गेंड ने कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. आपला एवढा समाज नवी मुंबईमध्ये असून परिचय नसल्यामुळे अनोळखीसारखे राहतो. सर्वांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण द्या. वेळेचे महत्व ओळख एकदा वेळ गेली कि नंतर विचार करून उपयोग नाही.
श्री. राजेश निमगिरे (Admin Manager- ICICI BANK, Chandivali Branch):
शिक्षणामध्ये आपण मागे का याचा आपण विचार करा. आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले तरच आपली मुले शिकतील व समाज सुशिक्षित होईल. आपण ८ वी. व ९ वी. झाली कि मुलीचे लग्न लावतो मग तिची मुले पुढे काय शिकणार? जर गृहिणी सुशिक्षित तर मुले सुशिक्षित.
श्री. सुखदेव येडवे (उपकार अधिकारी, नवी मुंबई):
लोणारी समाजातील सर्व उच्च शिक्षित बांधवांनी एकत्र येऊन चिंतन करायला हवे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत याच विचार मंथन हव. १० वी. १२ वी. पदवीधर लोकांसाठी व्यक्तिमत्व विकास हा कार्यक्रम घ्यायचा विचार आहे. सर्व उद्योजक मंडळींनी एकत्र येऊन समाजातील लोकांना मार्गदर्शन करायला पाहिजे.
श्री. वसंत सांगोलकर (उद्योजक):
महिलांनी पुढे आले पाहिजे. आता ५०% आरक्षण दिले आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे. आपण आपल्या माणसांची किंमत करत नसल्यामुळे आपला समाज मागे आहे. आपणच आपल्या माणसाची किंमत केली तर समाजाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. उपस्थित सर्व अधिकारी मंडळींनी आपापली क्षेत्रामधून समाजाला कसा फायदा होईल याबद्दल मार्गदर्शन करायला हवे.
श्री. भरत बाड (सचिव, लोणारी समाज सेवा संघ, मुंबई):
ज्यावेळी कोळसाबंदर येथे समाजाच्या मिटिंग व्हायच्या त्यावेळी लोकांसाठी आम्ही पण पान-तंबाखूची व्यवस्था करायचो. आता काळ बदलला आहे. ज्याप्रमाणे जमेल तशी समाजसेवा करत आहोत. मुंबईमध्ये वधू वर मेळावे होणे गरजेचे आहे त्याप्रमाणे पुढे विचार करण्यात येयील. आजचा कार्यक्रम आपला आहे व आज आलेले पदाधिकारी सामाज्याचे आधारस्तंभही आपले आहेत. त्यामुळे आम्ही सत्काराचा कार्यक्रम ठेवला नाही. सुशिक्षित लोकांचा मेळावा आटपाडी येथे आपल्या शाळेवर घेण्याचा विचार आहे. सर्वांनी आपल्या आटपाडी येथील शाळेला अवश्य भेट द्या. विचारमंथन व्हायला हवे, तरच नवीन काही निष्पन्न होईल. सर्व समाजाला एका श्रेणीमध्ये आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा. वधू वर मेळावा कश्यासाठी तर एकमेकांची ओळख करण्यासाठी व एकत्र येण्याचे एक साधन. आजकाल बर्याच घटना या न सांगण्यासारख्या घडत आहेत व तेच समाजबांधव उथळ माथ्याने समाजामध्ये वावरत आहेत. तरी आपण लग्न जमवितो तसे ते शेवटपर्यंत टिकवले पाहिजे. तडजोड केल्याशिवाय जीवनात मजा नाही. ते करायला सर्वांनी शिकले पाहिजे.
सांस्कृतिक कार्यक्रम: कु. महेश्वरी आढाव, कु. पूर्वा आढाव, कु. तृप्ती आढाव, कु. काजल बबन आटपाडकर, कु. सुशांत नरळे, कु. सुप्रिया आटपाडकर, कु. अपर्णा तुळसकर, कु. मनीषा करांडे, यां मंडळीनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला.
श्री. सुनील आटपाडकर यांनी आभार प्रदर्शन करून राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
वृत्तलेखन: श्री. ज्ञानेश्वर मच्छिंद्र नरळे (सहसचिव, मुंबई लोणारी समाज संघ)